आर.एम.एम.एस. खंडाळा येथे २७ आणि २८ ऑक्टोबर रोजी 'शरद पवार इन्स्पायर फेलोशिप फॉर एज्युकेशन (२०२५-२६)' अंतर्गत दुसरी शिक्षण फेलोशिप कार्यशाळा अत्यंत उत्साहात पार पडली. या कार्यशाळेला प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांचा मोठा प्रतिसाद लाभला; ९ माध्यमिक शिक्षकांपैकी ७ आणि १९ प्राथमिक शिक्षकांपैकी १८ शिक्षक उपस्थित होते. मे महिन्यात बारामती येथे झालेल्या पहिल्या कार्यशाळेनंतर अनेक शिक्षकांनी आपल्या शैक्षणिक प्रकल्पांमध्ये उल्लेखनीय प्रगती केली असून, काहींनी अत्यंत कल्पक प्रयत्न राबवल्याचे या दोन दिवसांत दिसून आले. या कार्यशाळेत शिक्षकांनी त्यांच्या प्रकल्पांचे सादरीकरण केले, ज्याचे सूक्ष्म निरीक्षण डॉ. वृषाली देहाडराय आणि ह. ना. जगताप सर यांनी केले. मार्गदर्शकांनी प्रकल्पांची प्रक्रिया आणि कार्यपद्धती अधिक परिणामकारक करण्यासाठी आवश्यक सुधारणा व बदलांबाबत मोलाचे मार्गदर्शन केले. सर्व फेलोंनी निवडलेले विषय हे नाविन्यपूर्ण आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी फलदायी ठरणारे आहेत, हे सादरीकरणातून स्पष्ट झाले.

कार्यशाळेच्या दरम्यान काही शिक्षकांच्या बदल्या झाल्यामुळे त्यांच्या प्रकल्पांच्या गतीत थोडा व्यत्यय आला असला, तरीही त्यांचे कार्य सुरू ठेवण्याबाबत सकारात्मकता दिसून आली. या महत्त्वपूर्ण सत्रास डॉ. वसंत काळपांडे, डॉ. माधव सूर्यवंशी, मूल्यांकन विभागाची चमू तसेच शिक्षण विभागाचे समन्वयक योगेश कुदळे आणि संजना पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. आता सर्व फेलो शिक्षकांना फेब्रुवारी महिन्यातील अंतिम कार्यशाळेसाठी आमंत्रित करण्यात आले आहे. या पुढील टप्प्यात शिक्षकांनी त्यांचे प्रकल्प अधिक 'डेटा-आधारित' आणि संख्यात्मक व गुणात्मक निकालांसह सादर करणे अपेक्षित आहे. प्रयोगाचे साहित्य, सुधारित कार्यपद्धती आणि विद्यार्थ्यांमध्ये झालेला नेमका बदल दर्शविणारे परिणामाभिमुख प्रोजेक्ट वर्क तयार करण्याच्या सूचना मार्गदर्शकांनी सर्व शिक्षकांना दिल्या आहेत.