शरद पवार इन्स्पायर शिक्षण फेलोशीप २०२५-२६ अंतर्गत तिसरी कार्यशाळा शनिवार, २१ फेब्रुवारी रोजी आर.एम.एम.एस. खंडाळा येथे सकाळी ११ वाजता उत्साहात सुरू झाली. दोन दिवसीय चाललेल्या या कार्यशाळेच्या पहिल्या दिवशी प्राथमिक आणि माध्यमिक विभागातील एकूण ३० पैकी २५ फेलो उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात यशवंतराव चव्हाण सेंटरचे शिक्षण विभाग प्रमुख योगेश कुदळे यांच्या प्रास्ताविकाने झाली. त्यांनी आगामी अंतिम कार्यशाळेत सादर करावयाच्या संशोधन पेपरची रचना कशी असावी, याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच, संस्थेच्या संकेतस्थळावर फेलोची माहिती अद्ययावत करण्यासाठी आवश्यक सूचना देऊन गुगल फॉर्मचे वाटप केले. या सत्रात ह. ना. जगताप यांनी प्रकल्प पेपरचे लेखन आणि सादरीकरण यातील तांत्रिक बाबींवर सखोल चर्चा केली. त्यानंतर, पहिल्या दिवशी ११ फेलोनी आपापल्या प्रकल्पांचे पॉवरपॉइंट प्रेझेंटेशन सादर केले. मागील कार्यशाळेनंतर प्रकल्पात केलेले बदल त्यांनी मांडले असता, महेंद्र गणपुले, वृषाली देहाडराय आणि ह. ना. जगताप यांनी प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून उपस्थितांना मार्गदर्शन करत आवश्यक सुधारणा सुचवल्या.
कार्यशाळेच्या दुसऱ्या दिवशी ३० पैकी २६ फेलो उपस्थित होते. सकाळी ९ वाजल्यापासून सादरीकरणाला सुरुवात होऊन दुपारच्या सत्रापर्यंत उर्वरित १५ फेलोनी आपले प्रेझेंटेशन यशस्वीरित्या पूर्ण केले. सादरीकरणानंतर वृषाली देहाडराय यांनी अभ्यास प्रकल्पाची आदर्श पद्धती आणि त्यातील संशोधन निकषांवर सर्व फेलोंशी सविस्तर संवाद साधला. ह. ना. जगताप, महेंद्र गणपुले आणि योगेश कुदळे यांनीही प्रकल्पाच्या दर्जाबाबत महत्त्वपूर्ण सूचना केल्या. कार्यशाळेचा समारोप करताना योगेश कुदळे यांनी आगामी मे महिन्यात बारामती येथे होणाऱ्या अंतिम कार्यशाळेचे नियोजन स्पष्ट केले. यावेळी आयोजित केल्या जाणाऱ्या प्रदर्शनातील पेपर मांडणीबद्दल त्यांनी सविस्तर माहिती दिली. शेवटी, सर्व उपस्थितांच्या सामूहिक छायाचित्रणानंतर या प्रेरणादायी कार्यशाळेची सांगता झाली.