यशवंतराव चव्हाण सेंटर अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या 'शरद पवार इन्स्पायर फेलोशीप इन एज्युकेशन २०२६-२७' च्या पाचव्या बॅचच्या पहिल्या कार्यशाळेचा प्रारंभ ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्र, बारामती येथे अत्यंत उत्साही वातावरणात झाला. या कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. ह. ना. जगताप, धनवंती हर्डीकर, डॉ. माधव सूर्यवंशी, महेंद्र गणपुले तसेच यशवंतराव चव्हाण सेंटरच्या शिक्षण विभागाचे प्रमुख योगेश कुदळे उपस्थित होते. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP २०२०) अंतर्गत मूल्यमापन या विषयावर संशोधन व प्रत्यक्ष शैक्षणिक प्रयोग करण्यासाठी निवड झालेले प्राथमिक व माध्यमिक शिक्षक आणि १० मेंटर्स या कार्यशाळेत सहभागी झाले आहेत.

कार्यशाळेच्या पहिल्या दिवशी शिक्षण प्रक्रियेतील निरीक्षण, श्रवणक्षमता, विद्यार्थ्यांचे अनुभवाधारित अध्ययन आणि मूल्यांकनातील संवेदनशीलता या पैलूंवर विशेष भर देण्यात आला. NEP २०२० मधील तरतुदी व NCF-SE २०२३ मधील विभाग ३ व ४ च्या संदर्भाने सत्रांना दिशा देण्यात आली. या वेळी शिक्षकांनी 'सेल्फ पोर्ट्रेट' या उपक्रमाद्वारे स्वतःच्या शैक्षणिक प्रवासाचे आत्मपरीक्षण केले. विद्यार्थ्यांचे उल्लेखनीय अनुभव, शिकताना दिसणारी अनपेक्षित सर्जनशीलता आणि त्यांची असामान्य उत्तरे यांवर चिंतन करत, "मूल्यांकन हे केवळ गुण देण्याचे साधन नसून विद्यार्थ्यांच्या शिकण्याच्या प्रक्रियेचे सूक्ष्म आकलन करण्याची पद्धत आहे," हा विचार अधोरेखित करण्यात आला.

दुसऱ्या दिवशी २०२५-२६ बॅचच्या फेलोंचे विशेष सत्र पार पडले. यामध्ये फेलोंनी आपापले संशोधन प्रकल्प डॉ. ह. ना. जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सादर केले. सादरीकरणादरम्यान संशोधनाची दिशा, उद्दिष्टे, कार्यपद्धती व निष्कर्षांची मांडणी यांवर सविस्तर चर्चा होऊन डॉ. जगताप यांनी आवश्यक सुधारणा व अचूकतेबाबत मार्गदर्शन केले. त्याच वेळी २०२६-२७ च्या नवीन बॅचचे 'मूल्यांकन' विषयावरील गटकार्य, अनुभव नोंदी आणि संवादात्मक उपक्रम दिवसभर सुरू होते. बारामती येथील ही दोन दिवसीय कार्यशाळा आगामी वर्षभर चालणाऱ्या संशोधन, प्रयोगशीलता आणि शैक्षणिक नेतृत्व विकासासाठी एक भक्कम पाया ठरली आहे.

Photo Gallery