यशवंतराव चव्हाण सेंटरच्या बाल शिक्षण विभागाचे दुसरे दोन दिवसीय शिबिर १ आणि २ नोव्हेंबर रोजी आर.एम.एम.एस. (RMMS), खंडाळा येथे उत्साहात संपन्न झाले. या शिबिरासाठी ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ निलेश निमकर, महाराष्ट्र बाल शिक्षण परिषदेच्या सचिव नेहा कुलकर्णी आणि शिक्षण विभाग प्रमुख योगेश कुदळे यांची प्रमुख उपस्थिती होती. शिबिराची सुरुवात योगेश कुदळे यांनी प्रास्ताविकाने केली, तर नेहा कुलकर्णी यांनी दोन दिवसांच्या कार्यक्रमाची रूपरेषा स्पष्ट केली. सुरुवातीच्या सत्रात ८ फेलो आणि ८ मेंटोर्सनी गेल्या तीन महिन्यांतील आपले अनुभव, शिकलेल्या गोष्टी आणि कामात आलेल्या त्रुटी मांडल्या. हा 'आईस ब्रेकिंग' (Ice breaking) संवाद अतिशय मोकळ्या वातावरणात पार पडला, ज्यामुळे सर्वांना एकमेकांच्या कार्यपद्धतीची आणि संशोधनाच्या प्रक्रियेची सखोल कल्पना आली.

संशोधन पद्धतीवर सविस्तर मार्गदर्शन करताना निलेश निमकर यांनी प्रत्येक फेलो आणि मेंटॉरशी वैयक्तिक चर्चा केली. त्यांनी मुख्यत्वे 'काय', 'कसे मोजणार' आणि 'पुढे काय' या तीन महत्त्वाच्या प्रश्नांवर भर देत संशोधन कार्याचे शीर्षक, प्रक्रिया आणि त्यातील आव्हाने यावर प्रकाश टाकला. संशोधनामध्ये केवळ आकडेवारीला महत्त्व न देता गुणात्मक माहिती (Qualitative Data) जपण्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. या फेलोशिपसाठी आपण चाचपणी (Exploratory) आणि निश्चितता (Confirmatory) अशा दोन्ही पद्धतींच्या मिश्र स्वरूपाचे काम करणार असल्याचे यावेळी निश्चित झाले. सामाजिक शास्त्रात निकाल नेहमीच वस्तुनिष्ठ नसतात, हे सांगतानाच त्यांनी चांगल्या गृहितकांचे (Hypothesis) महत्त्व स्पष्ट केले. याशिवाय, फेलोजच्या प्रत्यक्ष क्षेत्रीय कामाची पाहणी करून त्यांना आवश्यक ती मदत देण्याचेही यावेळी ठरवण्यात आले.

शिबिराच्या दुसऱ्या दिवशी कामाचे नियोजन आणि पुढील टप्प्यांवर चर्चा करण्यात आली. फेलोजनी तयार केलेल्या संशोधन लेखांचे संपादन करून त्यांचे पुस्तक प्रकाशित करण्याचा मानसही यावेळी व्यक्त करण्यात आला. मेंटोर्सच्या कार्यभाराबाबत चर्चा करताना, अधिक तज्ज्ञांची नियुक्ती करणे आणि सध्याच्या मार्गदर्शकांसाठी विशेष कार्यशाळा आयोजित करण्यावर एकमत झाले. निलेश निमकर यांनी मेंटोर्सना रिपोर्टिंगच्या पद्धती आणि १० मुख्य मुद्द्यांवर आधारित कामाचे स्वरूप स्पष्ट केले, ज्याची जबाबदारी नेहा कुलकर्णी यांनी स्वीकारली. शेवटी, योगेश कुदळे यांनी १४ डिसेंबर रोजी होणाऱ्या 'फेलोशिप अवॉर्ड सोहळ्या'ची माहिती दिली आणि ७ व ८ फेब्रुवारी रोजी खंडाळा येथेच पुढील कार्यशाळा होणार असल्याचे जाहीर करून शिबिराचा समारोप केला.