बालशिक्षणाच्या क्षेत्रातील विविध आव्हानांचा सखोल अभ्यास, संशोधन आणि प्रत्यक्ष कृतीच्या माध्यमातून परिणामकारक उपाय शोधण्याच्या उद्देशाने सुरू असलेल्या ‘शरद पवार इन्स्पायर फेलोशिप – बालशिक्षण’च्या दुसऱ्या बॅचची दुसरी कार्यशाळा २९ व ३० ऑगस्ट २०२६ रोजी एस. एम. जोशी सभागृह, पुणे येथे उत्साहात संपन्न झाली. पहिल्या कार्यशाळेत निश्चित केलेल्या उद्दिष्टांनुसार आतापर्यंत फेलोंनी केलेल्या कामाचा सर्वसमावेशक आढावा घेत, पुढील संशोधनाची दिशा अधिक स्पष्ट व परिणामकारक करण्यावर या दोन दिवसीय कार्यशाळेत प्रामुख्याने भर देण्यात आला.

या कार्यशाळेदरम्यान पहिल्या टप्प्यातील कामाची प्रगती, उद्दिष्टांनुसार झालेली वाटचाल आणि प्रत्यक्ष क्षेत्रीय कामात आलेल्या अडचणींवर सविस्तर चर्चा झाली. फेलोंनी आपापल्या प्रकल्पांसाठी तयार केलेल्या प्रश्नावली, माहिती संकलनाची साधने (Research Tools) आणि कार्यपद्धतीचे सादरीकरण केले. प्रश्नावलीतील प्रश्नांची नेमकी मांडणी, त्यांची स्पष्टता, प्रत्यक्ष क्षेत्रात त्यांची उपयुक्तता आणि आवश्यक माहिती मिळविण्याची अचूक क्षमता या पैलूंवर मार्गदर्शकांनी बारकाईने विश्लेषण करत मोलाचा अभिप्राय दिला.

प्रत्येक फेलोच्या प्रकल्पाच्या अनुषंगाने मार्गदर्शक आणि फेलो यांच्यात थेट संवाद, प्रश्नोत्तरे आणि समूह चर्चा पार पडल्या. मिळालेल्या अभिप्रायाच्या आधारे संशोधनाची पद्धती, माहिती संकलन, विश्लेषण, क्षेत्रीय काम आणि निष्कर्ष मांडणी यांसारख्या पुढील टप्प्यांचे ठोस नियोजन करण्यात आले. केवळ माहिती गोळा करण्यापुरते मर्यादित न राहता, बालशिक्षणाशी संबंधित प्रश्नांची मुळापासून कारणमीमांसा समजून घेणे आणि त्यातून प्रत्यक्ष अंमलात आणता येतील असे व्यवहार्य व शाश्वत उपाय विकसित करणे, हा या संपूर्ण प्रक्रियेचा मुख्य गाभा राहिला.

या कार्यशाळेला विशेष पाहुण्यांची उपस्थिती लाभली. पहिल्या दिवशी यशवंतराव चव्हाण सेंटरचे श्री. दत्ता बाळसराफ यांनी उपस्थित राहून सर्वांशी संवाद साधला, तर दुसऱ्या दिवशी यशवंतराव चव्हाण सेंटर, पुणे केंद्राचे कार्याध्यक्ष श्री. विशाल तांबे यांनी सदिच्छा भेट दिली. त्यांनी सर्व फेलोंशी चर्चा करत त्यांच्या शैक्षणिक प्रकल्पांची माहिती घेतली आणि पुढील वाटचालीबाबत मार्गदर्शन केले.

या दोन दिवसीय कार्यशाळेमुळे फेलोंच्या संशोधन प्रकल्पांना केवळ नवी दिशाच मिळाली नाही, तर संशोधनाची भक्कम चौकट, पुढील कामाची स्पष्ट योजना आणि यशस्वी अंमलबजावणीसाठीचा ठोस रोडमॅप तयार झाला.

Photo Gallery